शाओमी बंद करणार ‘मी’ ब्रांड

चीनी कंपनी शाओमी त्यांचा नामवंत ब्रांड ‘मी’ बंद करत असल्याची खबर असून यापुढे या ब्रांडची सर्व उत्पादने शाओमी नावानेच विकली जाणार असल्याचे समजते. अर्थात शाओमीने या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र नवीन ब्रांडिंगची सुरवात अपकमिंग ‘ मी एक्स ४’ स्मार्टफोन पासून होऊ शकते असे संकेत दिले आहेत. हा नवीन फोन ‘शाओमी मी एक्स ४’ नावाने येईल असेही समजते.

शाओमीचा हा नवा निर्णय फक्त स्मार्टफोन साठी आहे का अन्य उत्पादनांसाठी सुद्धा आहे याचा खुलासा होऊ शकलेला नाही. कारण बाजारात मी ब्रांडचे स्पीकर, बँड आहेत. ‘मी’ ब्रांडची सुरवात १० वर्षापूर्वी झाली होती. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या मी एक्स ३, मी एक्स २ मध्ये हा नवा बदल झालेला नाही मात्र मी एक्स ४ पासून तो होईल असे एक्सडीए डेव्हलपर्सचे म्हणणे आहे.

‘ मी’ ब्रांड ऑगस्ट २०११ मध्ये स्थापन झाला आहे आणि त्याखाली प्रथम शाओमी एम १ लाँच केला गेला. त्यानंतर स्मार्ट टीव्ही, टॅबलेट्स, स्मार्ट डिव्हायसेस, खेळणी व अनेक ऑडीऑ प्रोडक्ट या ब्रांड खाली सादर केले गेले, रिसर्च फर्म काउंटरपॉइंटच्या रिपोर्ट नुसार जून २०२१ मध्ये शाओमी जगातला नंबर वन ब्रांड बनला असून त्याच्या स्मार्टफोन विक्रीत मे च्या तुलनेत २६ टक्के वाढ झाली आहे. ग्लोबल बाजारात शाओमीचा १७.१ टक्के हिस्सा आहे.