यंदाही गणेशोत्सव, दसरा-दिवाळी साजरी करावी लागणार कोरोना नियमांसोबत; केंद्रीय आरोग्य मंत्रालय


नवी दिल्ली – देशावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याचा समज झालेला असतानाच महत्त्वपूर्ण माहिती पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने अद्यापही कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे सणासुदीच्या काळात काळजी घेण्याची आवश्यकता असल्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना नियमांसोबत यंदाही गणेशोत्सव, दसरा-दिवाळी साजरी करावी लागणार आहे. लसीकरण झाल्यानंतरही मास्क आणि कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे यावेळी आवर्जुन सांगण्यात आले आहे.

देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्यापही ओसरली नाही. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत नेहमीच सणासुदीनंतर वाढ झाल्याचे दिसून येत असल्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील सण जबाबदारीने साजरे करणे गरजेचे असल्याचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले. रोगाची तीव्रता लसीकरणामुळे कमी होते आणि रुग्णालयात दाखल करण्याची स्थिती ओढावत नसल्यामुळे लसीकरण झाल्यानंतरी मास्क आणि कोरोना नियमावलीचं पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.

त्याचबरोबर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केरळमधील कोरोना स्थितीवरही चिंता व्यक्त केली आहे. देशात सध्या रोज येणाऱ्या कोरोना प्रकरणात केरळमधून ५१ टक्क्याहून अधिक रुग्ण असल्याचेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. उत्सव काळात गर्दी टाळणे आवश्यक आहे. गर्दीमुळे कोरोना अधिक वेगाने पसरण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात अनिवार्य गर्दीच्या ठिकाणी दोन लस घेण्याची अट असावी, असं इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले.