माजी अफगाणी मंत्री आता पिझा बॉय म्हणून करतोय नोकरी

तालिबानी सेनेने अफगाणिस्थानच्या काबुलवर कब्जा केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासह अनेक राजकीय नेते देश सोडून परदेशात आश्रयासाठी गेले असल्याचे चित्र आहे. दरम्यान २०२० च्या डिसेंबर मध्येच देश सोडून गेलेले माजी दळणवळण मंत्री सैयद अहमदशाह सादात यांचा एक फोटो वेगाने व्हायरल झाला आहे. एके काळी बडा नेता आणि मंत्री असलेले सादात जर्मनीच्या लिपजीग शहरात पिझा डिलीव्हरी बॉय म्हणून नोकरी करत असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. गेले दोन महिने ते हे काम करत आहेत.

एकेकाळी चारी बाजूला सशस्त्र रक्षकांचा गराडा आणि नेहमी सुटबूट वेशात वावरणाऱ्या सादात यांच्या या फोटोवर विश्वास ठेवणे अवघड असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. पण रॉयटर्सला दिलेल्या एका मुलाखतीत सादत यांनी पिझा डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याचे सांगितले आहे. सादात यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून कम्युनिकेशन विषयात उच्च पदवी घेतली असून ते इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. सादात म्हणतात, जगातल्या १३ बड्या शहरात त्यांनी विविध पदांवर काम केले आहे पण आता देश सुटला आहे.

सादात सांगतात, सुरवातीला जेव्हा ते या शहरात आले तेव्हा त्यांना कोणतेच काम मिळाले नाही कारण त्यांना जर्मन भाषा येत नाही. त्यामुळे जर्मन शिकण्यासाठी ही नोकरी घेतली आहे. शहरातील विविध भागातील नागरिकांना भेटतो आहे आणि लवकरच दुसरी नोकरी घेईन.

तालिबानने कब्जा केल्यापासून अफगाणिस्थान मध्ये बँका, आरोग्य सेवा ठप्प झाली असून देशातील एटीएम रिकामी पडली आहेत. खाद्यपदार्थ, औषधे, रोजच्या गरजेच्या वस्तू तिप्पट महाग झाल्या आहेत. महिला नर्स कामावर येऊ शकत नाहीत आणि काबुल विमानतळ बंद केल्याने ५०० टन औषधे देशात पोहोचलेली नाहीत.