दुबईचे आकर्षण वाढविणार सर्वात मोठा फिरता पाळणा
पूर्वी जत्रा, यात्रा काळात गावोगावी फिरते पाळणे लोकांचे आकर्षण होते. ती जागा नंतर विजेवर चालणाऱ्या जायंट व्हील किंवा अतिउंच पाळण्यानी घेतली. आता जगातील सर्वात उंच ऑब्झर्वेशन व्हील किंवा सर्वात उंच फिरता पाळणा दुबई मध्ये सुरु होत आहे. अगोदरच अनेक आकर्षणामुळे लोकप्रिय पर्यटनस्थळ बनलेल्या दुबईत हा पाळणा आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे.
या ऑब्झर्वेशन व्हीलच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे मात्र संयुक्त अरब अमिरातीच्या ५० व्या स्थापना दिनाच्या दिवशी म्हणजे २२ ऑक्टोबरला त्याचे उद्घाटन केले जाणार आहे. २५० मीटर उंचीच्या या ऑब्झर्वेशन व्हील मधून दुबईचा सुंदर नजारा अनुभवता येणार आहे. हे व्हील ३८ मिनिटात एक फेरी पूर्ण करेल. ब्ल्यू वॉटर्स बेटावर हे प्रचंड व्हील बसविले गेले आहे.
गल्फ न्यूजच्या बातमीनुसार या महाव्हील मध्ये आकाशातच खाण्यापिण्याचा आस्वाद सुविधेसह १९ प्रकारची विशेष पॅकेज दिली जाणार आहेत. वाढदिवस, साखरपुडा, लग्न, व्यवसायिक कार्यक्रम यासाठी उत्सव पॅकेज आहे. खासगी केबिन सुविधा मिळणार आहे. दुबई होल्डिंग एंटरटेनमेंटचे प्रमुख अधिकारी मोहम्मद शराफ म्हणाले या ऑब्झर्वेशन व्हील मध्ये ४८ केबिन्स असून एकावेळी १७४० लोक याचा आनंद घेऊ शकतील. हे व्हील २४ तास सुरु राहणार आहे.
दुबई येथे नुकतेच जगातील सर्वात खोल स्वीमिंग पूलचे उद्घाटन झाले आहे. हा पूल ६० मीटर खोल असून त्यात १ कोटी ४० लाख लिटर पाणी आहे. पाण्याखाली रेस्टॉरंट, रुम्स आहेत.