आशियाई प्रवासी वर्गात भारतवंशी अमेरिकेत सर्वात समृद्ध

अमेरिकेतील एका मिडिया रिपोर्ट नुसार जनगणनेच्या आकडेवारीत ज्या ज्या आशियाई देशातून लोक अमेरिकेत आले आहेत त्यात भारतवंशी समुदाय सर्वात समृद्ध आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या विश्लेषणानुसार अमेरिकेतील भारतीय कुटुंबाचे सरासरी वार्षिक उत्पन्न १,२३,००० डॉलर्स असून राष्ट्रीय स्तरावर हे उत्पन्न सरासरी ६३९२८ डॉलर्स आहे.

भारतीय समुदायातील ७९ टक्के लोकांकडे अमेरिकन पदवी आहे आणि अन्य आशियाई समुदायांच्या तुलनेत कमाईत भारतीय पुढे आहेत. नंबर दोन वर तैवान ९७१२९ डॉलर्स सरासरी कमाई आणि फिलिपिनो ९५००० डॉलर्स सारासरी वार्षिक कमाईसह तीन नंबर वर आहेत.

संगणक, अर्थ, चिकित्सा व अन्य महत्वाच्या क्षेत्रात भारतीय अधिक प्रमाणात नोकऱ्यात असून डॉक्टर्सपैकी ९ टक्के डॉक्टर्स भारतवंशी आहेत. आशियाई लोकांचा आणि त्यातही भारतीय लोकांचा अमेरिकेच्या राजकारणात सुद्धा वाढता दबदबा असून गेल्या तीन दशकात आशियाई लोकांची संख्या अमेरिकेत तिपटी पेक्षा अधिक वाढली आहे.

एका रिपोर्ट नुसार या घडीला अमेरिकेत साधारण ४० लाख भारतवंशी असून त्यातील १६ लाख विसाधारक, १४ लाख स्थानिक नागरिक व १ लाख अमेरिकेत जन्म झालेले आहेत. अमेरिकी निवडणुकात आणि राजकारणात भारतीय प्रमुख भूमिका बजावताना दिसत आहेत.