काल दिवसभरात 37 हजार रुग्णांची नोंद, तर 648 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या चार दिवसांपासून 25 हजारांच्या आसपास स्थिरावत असतानाच त्यामध्ये आता पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहिर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशामध्ये 37,593 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे, तर 648 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. काल दिवसभरात 34,169 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोनाबाधितांचा मृत्यू दर हा 1.34 आहे, तर रिकव्हरी दर हा 97.68 टक्के आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ही 0.98 टक्के एवढी आहे.

तर महाराष्ट्रात मंगळवारी 4,355 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत राज्यात 62 लाख 43 हजार 034 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट 97.05 टक्के आहे. राज्यात मंगळवारी 119 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे.

दरम्यान आज तब्बल 38 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 49 हजार 752 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 11,962 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 15 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.