अफगाणिस्तानमधून भारतात परतलेल्या ७८ जणांपैकी १६ कोरोनाबाधित


नवी दिल्ली – काल भारतात अफगाणिस्तानमधून दाखल झालेल्या ७८ जणांपैकी १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्या सर्व ७८ जणांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

संसर्ग झालेल्यांमध्ये तीन ग्रंथींचा देखील समावेश आहे. जे काबूलहून सोबत पवित्र श्री गुरु ग्रंथ साहिबचे तीन सरूप घेऊन आले होते. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, परराष्ट्र राज्यमंत्री वी मुरलीधरन आणि भाजपा नेते आरपी सिंह यांनी मंगळवारी सकाळी विमानतळावर गुरु ग्रंथ साहिबचे सरुप घेतले. हे ग्रंथ यावेळी डोक्यावर घेऊन ते दिल्ली विमानतळावरून बाहेर आले होते.

सोमवारी काबूलहून वायु सेनेच्या एका विशेष विमानाने ताजिकिस्तानच्या दुशांबेसाठी उड्डाण घेतले होते. २५ भारतीय नागरिकांसह ७८ प्रवाशांना घेऊन, हे विमान मंगळवारी सकाळी दुशांबेहून दिल्लीत दाखल झाले होते. मंगळवारी केंद्रीयमंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधून आतापर्यंत २८८ भारतीय नागरिकांसह ६२६ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांनी हे देखील सांगितले की, त्यापैकी ७७ अफगाण शीख होते. अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीय नागरिकांच्या संख्येत भारतीय दूतावासात काम करणाऱ्या लोकांचा समावेश नाही.