कोथळा काढण्याची भाषा करणाऱ्या आमदार बांगर यांना नारायण राणेंचे प्रत्युत्तर


महाड – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती. याचदरम्यान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करत कोथळा बाहेर काढण्याचे वक्तव्य शिवसेनेचे हिंगोलीमधील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी केले होते. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी बांगर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आयुष्यात ज्यांने कधी साधा उंदीर मारला नाही, तो काय कोथळा काढणार असे राणे म्हणाले.

ज्याने आयुष्यात साधा उंदीर मारला नाही तो माझा कधी कोथळा बाहेर काढणार? कोथळा कसा असतो त्याला दाखवावा लागेल, असे नारायण राणेंनी बांगर यांना म्हटले आहे. तसेच शिवसेना वाढली त्यात माझा मोठा वाटा आहे, हे विसरू नका. मी शिवसेनेत असताना आताचे कोणीच त्यावेळी नव्हते, अपशब्द वापरणारे ही नसल्याचे राणे म्हणाले.

शिवसेना आमदार संतोष बांगर नारायण राणेंवर टीका करताना माध्यमांशी बोलताना म्हणाले की, अरे तू काय सांगतो कुठे यायचे. तुझ्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझे पोलीस संरक्षण थोडसे बाजूला करा, हा संतोष बांगर शिवसेनेचा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा एकटा येऊन, तुला चीत नाही केले आणि तुझा जर कोथळा बाहेर नाही काढला, तर संतोष बांगर म्हणू नको. दरम्यान, भाजप संतोष बांगर यांच्या वक्तव्यानंतर आक्रमक झाली आहे. बांगर यांच्याविरोधात भाजपकडून तक्रार देखील दाखल केली जाणार आहे.