राणेंच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांच्या पाठीवर मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप!


मुंबई – कालपासून राज्यात नारायण राणे आणि त्यांचे वक्तव्य यावरुन एकच चर्चा रंगली आहे. त्यावरुन झालेला राडा, नारायण राणेंची अटक, सुनावणी, जामीन, सुटका हा सगळा नाट्यमय प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला. शिवसेना आणि नारायण राणे संघर्ष राज्याला नवा नसला तरी यावेळी वातावरण चांगलेच तापले होते. अशातच आता राणेंच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या युवासैनिकांची उद्धव ठाकरेंनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

मंगळवारी मुंबईत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. युवासैनिकांनी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात थेट नारायण राणे यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केले. यावेळी युवासेना आणि राणे समर्थकांमध्ये प्रचंड धुमश्चक्री झाली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरा समोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला.

दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केल्याची माहिती समोर येत आहे.