मणीकरणला जाताय? मग या ठिकाणांना नक्की भेट द्या

हिमाचल प्रदेश हे मुळातच पर्यटकांचे आवडते राज्य असून येथे शेकडो सुंदर सुंदर पर्यटनस्थळे आहेत. कुल्लू घाटी मध्ये जायचा विचार असेल तर ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मणीकरणला नक्कीच भेट द्यायला हवी. चारी बाजूनी उंच पहाडांनी वेढलेले नी समुद्र सपाटी पासून साधारण ६३०० फुट उंचीवर वसलेले हे ठिकाण शीख धर्मियांच्या गुरुद्वारा मुळे जसे प्रसिद्ध आहे तसेच प्राचीन राम मंदिर, शिव मंदिर, हरिंदर पर्वत आणि गरम पाण्याची कुंडे यासाठी सुद्धा फेमस आहे.

येथील गुरुद्वारा मध्ये शीख गुरु नानक त्यांच्या पाच शिष्यांसह आले होते असे सांगतात. शीख धर्मीय येथे मोठ्या प्रमाणावर येतात. गुरुद्वारा जवळ गरम पाण्याची कुंडे असून चोहोबाजूनी बर्फाच्छादित शिखरे आणि कुंडात उकळते पाणी हा चमत्कार येथे दिसतो. या पाण्यात सल्फर, युरेनियम व अन्य रेडीओधर्मीय पदार्थ आहेत. या पाण्यात स्नान केल्याने अनेक त्वचा रोग बरे होतात असा अनुभव आहे. त्यामुळे याला औषधी जल असेच म्हटले जाते.

हरिंदर पर्वतावरून मणीकरण शहराचे सौंदर्य पाहता येते. कुलंत पीठ हे हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असून येथे असलेल्या कुंडांमध्ये विष्णू कुंड अतिशय शुध्द समजले जाते. या कुंडाचे धार्मिक महत्व मोठे आहे. या पाण्यात शिजविलेले अन्न सेवन केले तर विष्णू लोकाची प्राप्ती होते असा समज आहे.

येथील प्राचीन शिवमंदिर प्रसिद्ध असून या मंदिरात देवता स्वर्गातून येऊन शिवपूजन करतात असे मानले जाते. काळ्या पथ्थरात हे शिवलिंग बनविले गेले आहे. १९०५ च्या भूकंपात मंदिर एका बाजूला झुकले ते अजूनही तसेच आहे. तेव्हापासून येथे भाविकांची गर्दी वाढली असल्याचे सांगतात. १७ व्या शतकातील पिरामिड आकाराची वास्तुकला हे कुल्लूचे वैशिष्ट असून कुल्लू राजा जगतसिंग याने बांधलेले प्राचीन राम मंदिर आवर्जून पाहायला हवे. राजाने स्वतः अयोध्येतून मंदिरासाठी राम आणि सीतेची मूर्ती आणली होती. दसरा आणि रामनवमी दिवशी येथे मोठा उत्सव साजरा होतो.