जामीन मिळाल्यावर राणेंनी दोन शब्दात दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी अटक झालेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायालयाने काही अटींवर, १५०००च्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.  त्यांना ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी महाड पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागणार आहे. शिवाय भविष्यात अशी वक्तव्ये नको असेही न्यायालयाने बजावले आहे. दरम्यान जामीन मिळाल्यावर राणे यांनी ट्विटरवर फक्त दोन शब्दांची प्रतिक्रिया दिली असून त्यात ‘ सत्यमेव जयते’ असे लिहिले आहे.

नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली होती. ठाकरे यांच्याविषयीच्या वक्तव्याबद्दल राणे याच्याविरोधात चार एफआयआर विविध ठिकाणी दाखल केले गेले आहेत. मंगळवारी उशिरा राणे यांना महाड न्यायालयात हजर केले गेले. सरकारी वकील आणि राणे यांच्या वकिलांनी आपापल्या बाजू मांडल्यावर राणे यांना न्यायदंडाधिकारी शेखबाबासो पाटील यांनी जामीन मंजूर केला.

राणे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसैनिक जागोजागी निदर्शने करत आहेत तर भाजपने राणे यांच्या विधानाशी सहमत नसलो तरी राणे यांच्या मागे पक्ष ठाम उभा राहील असे म्हटले आहे.