उद्धवजींना त्यांच्याच वक्तव्याची करून दिली जातेय आठवण

मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा न राखता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांना अटक करण्याचे नाट्य रंगले असतानाच सोशल मीडियावर राजकीय नेत्यांची बिघडलेली वक्तव्ये वेगाने व्हायरल होऊ लागली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०१८ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.

२०१८ मध्ये योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना पायातील खडावा काढल्या नव्हत्या तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ‘ हा योगी गॅस भरलेल्या फुग्यातून आल्यासारखा आला आणि खडावा सकट थेट महाराजांच्या पुतळ्याजवळ गेला. असे वाटले त्याच चपलेने त्याला ठोकून काढावे’ असे विधान केले होते. हा सुमार भाजप आणि शिवसेनेतील नाते दुरावण्याचा होता.

उद्धव यांच्या वक्तव्याला योगी यांनी विशेष महत्व दिले नाही. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना योगी यांनी ‘त्यांच्यापेक्षा माझ्यामध्ये अधिक शिष्टाचार आहेत, श्रद्धांजली कशी द्यायची ते मला चांगले समजते, ते त्यांच्याकडून शिकण्याची गरज वाटत नाही’ असे म्हटले होते. दरम्यान राणे यांच्यावर एफआरआर दाखल झाल्यावर नाशिक आणि काही ठिकाणी शिवसैनिकांनी भाजप कार्यालयांवर दगडफेक केली आणि उद्धवजींचा आदेश आहे असेही सांगितले होते. त्यावरून सुद्धा आता वातावरण तापले आहे.