जोपर्यंत नारायण राणेंची सुटका होत नाही, तोपर्यंत कोकण शांत होणार नाही – प्रमोद जठार


रत्नागिरी – महाराष्ट्र पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली आहे. गुन्हा रद्द मुंबई उच्च न्यायालयाने करण्याच्या राणेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक नारायण राणे कोणत्याही अटक वॉरंटशिवाय संगमेश्वरला पोहोचले असल्याचे भाजप नेते प्रमोद जठार यांनी म्हटले होते. राणेंना अटक करण्यासाठी रत्नागिरी पोलीस अधीक्षकांवर प्रचंड दबाव आहे आणि त्यांना ५ मिनिटात अटक करण्यास सांगितले असल्याचे जठार यांनी म्हटले होते. त्यानंतर नारायण राणे यांना ताब्यात घेत अटक केली आहे. यावर याच संगमेश्वरात संभाजी महाराजांनासुद्धा अटक झाली होती आणि औरंबगजेबचे सरकार पडले होते, अशी प्रतिक्रिया प्रमोद जठार यांनी दिली आहे.

आजच्या दिवसापुरती जन आशीर्वाद यात्रा थांबलेली आहे. आता यात्रेचे परिवर्तन आंदोलनात झाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत नारायण राणेंची सुटका होत नाही, तोपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात भाजप आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. सरकारने एक लक्षात घ्यावे याच संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराजांनासुद्धा अटक झाली आणि औरंगजेबाचे सरकार संपले होते. त्यामुळे या महाराष्ट्रात या सरकारचं थडगे उभे केल्याशिवाय भाजप राहणार नसल्याची प्रतिक्रिया प्रमोद जठार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

तिकडे १०० कोटींची खंडणी घेणारे आणि बलात्कारी मोकळे फिरत आहे, सरकारला लाज वाटली पाहिजे. आमच्या या मराठ्याला या संगमेश्वरात अटक झालेली आहे. जोपर्यंत नारायण राणेंची सुटका होत नाही, तोपर्यंत कोकण शांत होणार नसल्याचे प्रमोद जठार यांनी म्हटले आहे.