कायद्यानुसार नारायण राणेंना अटक करण्याची प्रक्रिया सुरू


नाशिक – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या नारायण राणे यांच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाल्याचा माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे. नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचे गांभीर्य पाहून याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राणेंना अटक करण्यासाठी पथक पाठवण्यात आले आहे. राणेंच्या अटकेदरम्यान त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाचा आदर राखून तसेच हक्कभंग होणार नाही, याची दक्षता घेऊन कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याच्या केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात आता चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवसैनिक संतापले असून राणेंवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. संतापलेल्या शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून नाशिकमध्ये भाजप कार्यालयाची शिवसेनेकडून तोडफोड करण्यात आली आहे. तर जुहूमध्येही शिवसैनिकांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. नारायण राणेंच्या या वक्तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राणेंविरोधात राज्यात तीन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.