पंतप्रधान कार्यालयाने अवघ्या १० मिनिटात घेतली राणेंच्या राजीनाम्याच्या मागणीची दखल – विनायक राऊत


नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी अटकेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणेंना केलेली अटक योग्य असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. तसेच त्यांनी नैतिकता राखून राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

पोलिसांवर अटक करताना कोणताही दबाव नव्हता. पोलीस कायद्याचे रक्षणकर्ते आहेत. त्यांनी कायद्याचे रक्षण केले आहे. वातावरण चिघळण्याची शक्यता नाही. ज्यांनी जसे करावे तसे भरावे. वातावरण चिघळण्याची सुरुवातच नारायण राणे यांनी केलेली आहे. त्यांना अटक करण्याची आवश्यकता होती. वातावरण चिघळले तर ती जबाबदारी भाजपाची असेल.

देवेंद्र फडणवीस यांचे मी कौतुक करेन, त्यांनी राणेंच्या वक्तव्याचे समर्थन केले नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास केंद्रीय मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीचे वर्तन आणून दिले. मला अभिमान वाटतो, अवघ्या दहा मिनिटात या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पत्राची दखल घेतली.

दुपारी त्यांच्या कार्यालयातून मला फोन आला आणि मला सांगितले की, पंतप्रधान बैठकीत व्यस्त आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्याशी तुम्ही बोला, मी अमित शहा यांच्याकडे तुमचे तक्रार पत्र पाठवले आहे. नारायण राणे यांनी जनाची नाही, तर मनाची लाज राखून ताबडतोब केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे.