खाद्यतेलाच्या किंमतीत 20 टक्क्यांची वाढ


नवी दिल्ली : एकीकडे देशातील नागरिक इंधन दरवाढीमुळे आधीच हैराण झालेले असताना आता सर्वसामान्यांचे कंबरडे खाद्य तेलाच्या आणि डाळींच्या वाढलेल्या दरामुळे मोडले आहे. खाद्य तेलाचे भाव गेल्या एका महिन्याच्या कालावधीत 20 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. देशातील खाद्य तेल आणि डाळींच्या किंमती वाढण्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या किंमती या कारणीभूत असल्याचे भारतीय उद्योग मंडळाने सांगितलं आहे.

एकीकडे खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये 20 टक्क्यांची वाढ झाली असताना दुसरीकडे डाळीच्या किंमतीमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. दिल्लीच्या रिटेर बाजारपेठेत डाळीच्या किंमतीमध्ये विक्रमी वाढ झाली असून आतापर्यंतच्या सर्वात जास्त या किंमती असल्याचं सांगण्यात येते.

दिल्लीमध्ये रिफाईन्ड ऑईलच्या दरात पाच रुपयांची तर इतर प्रकारच्या तेलाच्या किंमतीत 15 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. आधीच लॉकडाऊन आणि अवकाळी पावसामुळे उत्पादन कमी झाले होते, त्याचबरोबर खाद्यतेलाची आयात कमी झाली होती. आता मागणी वाढली आहे. आता आयातीवरील कर केंद्र सरकारने कमी केले तरच तेल आणि डाळींचे भाव कमी होतील. डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे वाहतूक खर्च पण वाढला हे ही त्यामागील एक कारण आहे.