हे आहे अफगाणीस्तानचे चलन आणि येथे होते त्याची छपाई

अफगाणीस्तानचे अधिकृत चलन अफगाणी हे असून काबुलवर तालिबानने ताबा केल्यानंतर हे चलन अस्थिर बनले आहे. त्याचे मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. अफगाणी या चलनाची छपाई ब्रिटन मधील एका खासगी प्रेस मध्ये केली जाते.

एक जमाना असा होता की अफगाणिस्थानचे चलन अफगाणी रुपया होते. १९२५ मध्ये अफगाणी हे नवे चलन वापरात आणले गेले. या चलनाचे छपाई, वितरण आणि नियंत्रण करण्याचे काम केंद्रीय बँक द अफगाणकडे असून ही बँक १९३९ मध्ये स्थापन झाली आहे. तिचे मुख्यालय काबुल मध्ये आहे आणि देशभरात तिच्या ४६ शाखा आहेत.

तालीबान्यानी २० वर्षापूर्वी जेव्हा अफगाणिस्थानची सत्ता मिळविली होती तेव्हाही हेच चलन वापरात होते. मात्र तेव्हा त्याचे मूल्य खुपच घसरले होते. या चलनात १ अफगाण पासून १ हजार अफगाण मूल्याच्या नोटा आहेत. १ अफगाण नोट आणि नाणे स्वरुपात आहे. दर पाच वर्षांनी नवीन नोटा छापल्या जातात.

इंग्लंडच्या बेसिंगस्टोक मधील ले रा रूट या खासगी प्रेसमध्ये अफगाणीची छपाई होते. हे जगातील सर्वात मोठे चलन छापणारे खासगी प्रेस आहे. येथे अन्य १४० देशांचे चलन सुद्धा छापले जाते. येथील सुरक्षा मार्क अतिशय बळकट आहेत आणि त्यामुळे येथे छापल्या गेलेल्या नोटांच्या बनावट नोटा तयार करणे अवघड मानले जाते. अफगाणीचे डिझाईन सुद्धा हेच प्रेस करते. येथे १, ५, १०, ५०, १००, ५००, १००० मूल्याच्या नोटा छापल्या जातात. भारतीय रुपयाच्या तुलनेत १०० भारतीय रुपये म्हणजे ११५ अफगाणी असे प्रमाण आहे.