केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश?

भाजप मध्ये प्रवेश केल्यावर केंद्रीय मंत्री बनलेले नारायण राणे यांच्या विरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरूण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले गेल्याचे समजते. नारायण राणे सध्या चिपळूण येथे मुक्कामास आहेत. राणे यांच्याविरोधात नाशिक येथे पोलीस तक्रार दाखल झाली असून नाशिक पोलीस राणे याच्या अटकेसाठी रवाना होत असल्याचे समजते.

जन आशीर्वाद यात्राप्रकरणात मुंबई पोलिसांनी भाजप नेते आणि कार्यकर्ते याच्या विरोधात अगोदरच २२ एफआरदाखल केले आहेत मात्र त्यात नारायण राणे यांच्यावर एफआयआर दाखल झालेला नव्हता. राणे सोमवारी महाडमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी पत्रकार परिषदेत, दही हंडीवर महाराष्ट्र सरकारने घातलेल्या बंदीवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरले. ते म्हणाले,’ मला मुख्यमंत्र्यांची लाज वाटते. मुख्यमंत्र्यांना देशाला स्वातंत्र कुठल्या वर्षी मिळाले ते वर्ष सुद्धा माहिती नाही. स्वातंत्रदिनाच्या भाषणात हे दिसले. मी तेथे असतो तर एक थप्पड लगावली असती.’

राणेंच्या या वक्तव्याने शिवसैनिक संतापले असून राज्यात विविध ठिकाणी निदर्शने करत आहेत. राणे यांच्याविरोधात नाशिक येथे पोलीस तक्रार दाखल झाली असून राणे याच्या अटकेचा आदेश दिला गेला आहे असे समजते. दरम्यान मुंबईत राणेपुत्र खासदार नितेश यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून घराला वेढा घातला आहे असेही वृत्त आहे. निलेश राणे यांनी ट्विटरवरून ‘ सिंहाच्या गुहेत कुणीच घुसू शकत नाही. घराबाहेरच्या गर्दीला मुंबई पोलिसांनी हटवावे. अन्यथा पुढे जे घडेल त्याला मुंबई पोलीस जबाबदार असतील’ असे म्हटले आहे.