जलसंपदामंत्री जयंत पाटील व महाआघाडी सरकारवर राजू शेट्टींची जोरदार टीका


कोल्हापूर : दुष्काळी भागाकडे कृष्णा, पंचगंगा नदीतील महापुराचे पाणी बोगद्यातून वळवण्याच्या घोषणा निव्वळ धूळफेक आहे. अशा मोठ्या भांडवली खर्चच्या योजना आखून त्यातून पैसे हाणायचा उद्योग होणार आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची ही योजना कधीच पूर्ण होणार नसल्याची टीका माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरीचे संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.

आज कोल्हापुरातील दसरा चौकातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हजारो शेतकरी न्याय मिळाला पाहिजे, अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचले. यावेळी राजू शेट्टी यांनी शासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.

आघाडी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार अशी घोषणा करून, पूरग्रस्तांची फसवणूक करत असल्याचा आरोप करून शेट्टी म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना पॅकेज देण्याची घोषणा केली. पण अद्याप कसलीही मदत मिळालेली नाही. मी ठाकरे यांच्याकडे मदत मिळण्यासाठी गेलो, पण भेट दिली नाही. अजूनही मदत दिली जात नाही. सानुग्रह अनुदान ही उपलब्ध केलेले नाही. मागील २०१९ सालच्या महापुराप्रमाणे मदत केली पाहिजे. पुराने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शाळा, कॉलेज सुरू झाले असल्यामुळे फी कशी भरायची? याची चिंता सतावत असल्याने ती माफ झाली पाहिजे.

दरम्यान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये. राज्यशासन मदतीसाठी तत्पर आहे, असे आवाहन केले होते. दोन्ही मंत्र्यांवर राजू शेट्टी यांनी टीका केली. ते म्हणाले, पूरग्रस्त शेतकऱ्यांना महिना झाला तरी दमडीही मिळाले नाही. अशावेळी केवळ नुसते शांत बसायचे की भजन करत राहायचे हे मुश्रीफ यांनी सांगावे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी नेमकी काय मदत केली, याचे स्पष्टीकरण करावे. पोकळ घोषणा करू नयेत, असे शेट्टी म्हणाले.