सासरवाडीच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या


पुणे – पुण्यात सासरवाडीच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या ओढणीने या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आपले आयुष्य संपवले. सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून तसेच कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये तरुणाने केला आहे. यावेळी त्याने पत्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत कडक कारवाईची मागणी केली आहे.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे निखिल धोत्रे असे नाव आहे. तो पुण्यातील शिवाजीनगर-गोखलेनगर भागात वास्तव्यास होता. वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. रविवारी संध्याकाळी निखिलने राहत्या घरी पत्नीच्या ओढणीने गळफास घेत आयुष्य संपवले. दरम्यान पोलिसांनी सुसाईड नोट सापडली असून यामध्ये त्याने सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून तसेच कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा उल्लेख निखिलने पत्रात केला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंेच आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन, मी समजून माझ्या बाळाला सांभाळ कर, त्याची काळजी घे, असा उल्लेखही चिठ्ठीत करण्यात आला आहे.