अभिमानास्पद ! भारतीय लष्करात २६ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांची कर्नल पदावर पदोन्नती


नवी दिल्ली – कर्नल (टाइम स्केल) पदावर भारतीय लष्करात २६ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. हा निर्णय एका निवड मंडळाने दिला आहे. कर्नल पदावर कॉर्प्स ऑफ सिग्नल, इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स (ईएमई) आणि कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्समध्ये सेवा देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना मान्यता देण्याची ही पहिलीच वेळ आहे. पूर्वी, केवळ आर्मी मेडिकल कॉर्प्स (एएमसी), जज अॅडव्होकेट जनरल (जेएजी) आणि आर्मी एज्युकेशन कोर (एईसी) मधील महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर पदोन्नती लागू होती.

महिला अधिकाऱ्यांसाठी भारतीय लष्कराच्या विविध शाखांमध्ये पदोन्नतीचे मार्ग वाढवून लष्करात त्यांच्यासाठी करिअरच्या संधी वाढण्यासाठी हा महत्वाचा निर्णय आहे. भारतीय लष्कराच्या बहुसंख्य शाखांमधून महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचा निर्णय येत्या काळात भारतीय लष्करात लैंगिक समानतेच्या दृष्टीकोनातून महत्वाचा ठरेल.

सिग्नल कॉर्प्समधून लेफ्टनंट कर्नल संगीता सरदाना, ईएमई कॉर्प्समधून लेफ्टनंट कर्नल सोनी आनंद आणि लेफ्टनंट कर्नल नवनीत दुग्गल आणि कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समधून लेफ्टनंट कर्नल रीनु खन्ना आणि लेफ्टनंट कर्नल रिचा सागर यांचा कर्नल पदासाठी निवडलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.