अफगाणिस्तानातील निर्वासितांना रशियाच्या जवळील देशांमध्ये आश्रय देण्यावर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा आक्षेप


मॉस्को – राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अफगाणिस्तानातून सुटका केल्यानंतर तेथील निर्वासितांना रशियाच्या जवळील देशांमध्ये आश्रय देण्यावर आक्षेप घेतला आहे. दहशतवाद्यांना निर्वासितांच्या नावाखाली आश्रय मिळू नये, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, रशियामध्ये आम्हाला अफगाण दहशतवादी नको असल्याचे पुतिन म्हणाले आहेत.

काही पाश्चिमात्य देशांकडून अफगाणिस्तानमधील निर्वासितांना मध्य आशियाई देशांमध्ये स्थलांतरित करण्याच्या कल्पनेला पुतीन यांनी विरोध केला आहे. दरम्यान या निर्वासितांच्या अमेरिका आणि युरोपच्या व्हिसाची प्रक्रिया सुरू आहे. याचा अर्थ पाश्चिमात्य देश स्वत: व्हिसाशिवाय कोणालाही प्रवेश देत नसताना व्हिसाशिवाय आपल्या शेजारी देशांमध्ये पाठवले जाणार आहे?, असा सवाल पुतिन यांनी सत्ताधारी युनायटेड रशिया पार्टीच्या नेत्यांशी बोलताना उपस्थित केला.

यावेळी त्यांनी समस्या सोडवण्यासाठी असा अपमानास्पद दृष्टिकोन का आहे? असेही विचारले आहे. गेल्या आठवड्यात रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन सरकारसाठी काम केलेल्या अफगाणिस्तानमधील नागरिकांना तात्पुरता आश्रय मिळावा यासाठी अमेरिका अनेक देशांसोबत गुप्तपणे चर्चा केली आहे. पण त्याला रशियाने विरोध केला आहे. निर्वासितांच्या नावाखाली दहशतवादी दिसावेत अशी आमची इच्छा नसल्याचे पुतिन यांनी स्पष्ट केले आहे.

अफगाणिस्तानातून लोकांची काही पाश्चिमात्य देश सुटका करत असताना दुसरीकडे मॉस्कोने मात्र देशात तालिबानने परिस्थिती हाताळल्याबद्दल कौतुक केले आहे. तालिबान नेते सध्या तरी दिलेले आश्वासन पाळत असल्याचे रशियाचे परराष्ट्र मंत्री सेरेगी यांनी म्हटले आहे.