मिलिंद नार्वेकरांनी स्वतःच चालवला आपल्या आलिशान बंगल्यावर बुलडोझर


मुंबई – दापोलीमधील मुरुड येथील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यावर रविवारी कारवाई करत हातोडा चालवण्यात आला. दरम्यान आपला बंगला मिलिंद नार्वेकर यांनी स्वतःच पाडल्याचे समोर आले आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचे बांधकाम अनधिकृत असून सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्पेसने दिले आहे.

यासंदर्भात शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाला कारवाई करण्यास मिलिंद नार्वेकर यांनीच सांगितले होते. मुरुडमध्ये दोन हजार स्क्वेअर फुटांचा बंगला मिलिंद नार्वेकर यांनी बांधला होता. कोणताही वाद, अडचण निर्माण होऊ नये यासाठी मिलिंद नार्वेकर यांनीच आपला बंगला पाडल्याचे बोलले जात आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यावर कारवाई केल्याचा व्हिडीओ ट्वीट केला होता. दरम्यान मिलिंद नार्वेकर यांच्याप्रमाणे या बंगल्याजवळील परिवहनमंत्री अनिल परब यांचेही बेकायदा रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.