आता यापुढे जिथे जिथे निवडणुका होतील, तिथे सत्ताधारी भुईसपाट होतील – चंद्रकांत पाटील


रायगड – कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच तेथील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी देशभर भाजपकडून जन आशिर्वाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. मुंबईनंतर आता रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे.

या यात्रेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपा राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांची प्रमुख उपस्थिती आहे. नारायण राणेंनी यावेळी जनतेचे प्रेम कायम असल्याचे सांगितले. तर महाविकास आघाडी सरकारवर चंद्रकांत पाटील आणि सुनिल देवधर यांनी टीकास्त्र सोडले.


नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद जन आशीर्वाद यात्रेला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर जनता खूश आहेत. सत्ताधारी पंढरपूर आणि साडे सहा हजार गावांमध्ये पराभूत झाले. आता यापुढे जिथे जिथे निवडणुका होतील, तिथे भुईसपाट होतील. असे या यात्रेतील प्रतिसादावरून दिसत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

यात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद आहे. लोकांमध्ये आजही नारायण राणे यांच्याबद्दल तितकेच प्रेम आहे. लोकांचे भरभरून प्रेम नारायण राणेंच्या यात्रेला मिळत असल्यामुळेच सरकार आमच्यावर गुन्हे दाखल करत आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरे घाबरल्याचे दिसत असल्याचे भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी सांगितले.