ऑक्टोबर महिन्यात विक्राळ रुप धारण करणार कोरोना; लहान मुलांना सर्वाधिक धोका


नवी दिल्ली – एकीकडे देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही भीती सतावू लागली आहे. लहान मुलांना ह्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका असल्याची माहिती समोर येत असल्यामुळे पालकांच्या काळजीत भर पडली आहे. अशातच आता या तिसऱ्या लाटेसंदर्भात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या तज्ज्ञांच्या समितीने महत्त्वाचा इशारा दिला आहे.

ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट विक्राळ रुप धारण करु शकते, असा इशारा या समितीकडून देण्यात आला आहे. या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचेही या समितीकडून सांगण्यात आले आहे. या समितीने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, लहान मुलांना ज्या प्रमाणात कोरोनाची लागण होऊ शकते, त्या प्रमाणात आपल्याकडे आत्ता पुरेशा आरोग्यसुविधा उपलब्ध नाहीत. हा अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडेही पाठवण्यात आलेला आहे.

तसेच या अहवालात सहव्याधी असलेल्या तसेच दिव्यांग असलेल्या लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात यावे अशी सूचनाही करण्यात आली आहे. कितीही खबरदारी घेतली तरीही कोरोनाची तिसरी लाट ही ऑक्टोबर अखेरपर्यंत येण्याची शक्यता असल्याचेही या समितीकडून सांगण्यात आले आहे.

अद्यापपर्यंत लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झालेली नाही, ह्या मुद्द्यावर अनेक तज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात आली. त्यातून असे लक्षात आले आहे की, कोरोना विषाणूचा अतिगंभीर परिणाम लहान मुलांवर होणार नसला तरीही ह्या मुलांमुळे इतरांमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. तसेच कोरोनाची तिसरी लाट ही इतर दोन लाटांपेक्षा सौम्य स्वरुपाची असेल अशीही माहिती या अहवालाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.