तीन महिन्यानंतर बिटक्वाइनचा क्वाइनडेस्कवर रेट ५० हजाराच्या वर


नवी दिल्ली – सध्या जगभरात क्रिप्टोकरंसीची जोरदार चर्चा आहे. अनेकांनी झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून क्रिप्टोकरंसीत गुंतवणूक करण्याकडे धाव घेतली होती. बिटक्वाइनचे बाजार भांडवल ९४३ अब्ज डॉलर्स एवढे आहे. १ ट्रिलियन डॉलर्सच्या जवळ आहे. पण बिटक्वाइनवर अनेक देशांनी बंधने लादल्यानंतर क्रिप्टोकरंसीची चमक गेल्या काही महिन्यात कमी झाली होती.

पण आता बिटक्वाइनचा क्वाइनडेस्कवर रेट तीन महिन्यानंतर ५० हजाराच्या वर सुरु आहे. पुन्हा एकदा क्रिप्टोकरंसीकडे गुंतवणूकदार वळल्यामुळे भाव वधारल्याचे म्हटले जात आहे. सर्वात मोठी क्रिप्टोकरंसी असलेल्या बिटक्वाइनची किंमत ५०,१५२.२४ डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. गेल्या तीन महिन्यात क्रिप्टोकरंसीत २.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

क्रिप्टोकरंसीमध्ये एप्रिल महिन्यात विक्रमी घसरण झाली होती. बिटक्वाइनमध्ये ६५ हजार डॉलरवरून ३० आणि ४० हजार डॉलर्सपर्यंत घसरण झाली होती. पण बिटक्वाइनमध्ये आता पुन्हा एकदा तेजी दिसून येत आहे. क्रिप्टोकरंसीचा भाव पुढील काही दिवस आणखी वधरण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. क्रिप्टोकरंसी मार्केटमध्ये चढ-उतार सामान्य बाब असल्यामुळे अचानक झालेली वाढ पाहता गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगायला हवी, असे मतही जाणकारांनी व्यक्त केले आहे.