पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी; नव्या कोरोनाबाधितांची संख्या दोन आकड्यात


पुणे : मागील 24 तासांत पुणे शहरात नव्याने कोरोनाबाधित आढळलेल्यांची संख्या 100 च्या खाली आली असून आज नव्याने 97 कोरोनाबाधितांची नोंद पुणे शहरात करण्यात आली आहे. तर 233 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासांत 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या 1936 कोरोनाबाधितांवर पुणे शहरातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये 205 रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांची संख्या 4,91,959 एवढी झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4,81,133 झाली आहे. पुणे शहरात आतापर्यंत 8,890 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात गेल्या 24 तासांत 5,778 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यासोबतच आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा हा 30,68,021 वर गेला आहे.

दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चर्चेवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे निती आयोगाने म्हटले होते. राज्यात सध्या निती आयोगाच्या पत्राची जोरदार चर्चा सुरु आहे. निती आयोगाचे पत्र जून महिन्यातील असून त्यावरुन सध्या चर्चा सुरु असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. आपल्याला सध्या तरी काळजी करण्याची गरज नाही. तरी, पण आपण तिसऱ्या लाटेचा अंदाज घेत आहोत.

राज्य शासन तिसरी लाट आली, तरी तयार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते आज जालन्यात बोलत होते. तसेच सध्या तरी राज्यातील मंदिरे आणि शाळा कॉलेज उघडण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊनच मंदिर आणि शाळा कॉलेज उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.