मनाली ते व्यास कुंड, तुलनेने सोपा पण निसर्गरम्य ट्रेक

अनेकांना ट्रेकिंगची आवड असते. सध्याचा सिझन हा हिमालयातील ट्रेकसाठी अतिशय अनुकूल असतो. ज्यांना ट्रेकिंग करायचे आहे पण ट्रेकिंगचा फारसा अनुभव नाही, त्यांनाही करता येणारे अनेक ट्रेक आहेत. त्यातील एक मनाली व्यास कुंड ट्रेक. कुल्लू घाटीतील जुन्या मनाली पासून सुरु होणारा हा ट्रेक १६ किमीचा आणि १२ हजार फुट उंचीपर्यंत नेणारा छान ट्रेक आहे.

हनुमान टीब्बा आणि सात बहिणींच्या कुशीत ३६५० मीटर उंचीवरचे हे सरोवर आहे. प्राचीन काळात महर्षी व्यास येथे स्नानासाठी येत असत असा समज आहे. हे नदीचे उगमस्थान असून व्यास ऋषीच्या वरून नदीचे नाव व्यास पडले आहे. अर्थात यालाच बियास किंवा ब्यास असेही म्हटले जाते. सोलन घाटी ते कुंडार हा सर्व मार्गच मुळी अतिशय मनोहर आहे. हा ट्रेक तुलनेने सोपा आणि लोकप्रिय आहे.

तीन दिवसाचा हा ट्रेक जुन्या मनालीतील कॅम्प पासून सुरु होतो. सोलांग नाल्यातून मार्गक्रमणा करत ३१५० मीटर उंचीवरच्या धुंडी येथे आणि तेव्हून आणखी वर जाऊन बकारथ येथे आणि शेवटी व्यासकुंड येथे पोहोचता येते. हा रस्ता मध्यम आहे. म्हणजे फार सोपा नाही आणि फार अवघड नाही. रस्त्यात तंबू मध्ये मुक्काम करता येतो. गाईड सोबत असतील तर कोणतीच अडचण अगदी नवख्या ट्रेकर्सना सुद्धा येत नाही. अतिशय निसर्गरम्य, बर्फाच्छादित शिखराच्या सहवासात राहण्याची संधी देणारा हा ट्रेक नक्की करुन पाहायला हरकत नाही.