चीनी गडबडीमुळे यंदाच्या फेस्टिव सेल मध्ये वस्तू स्वस्त मिळण्यात अडचण

भारतात ई कॉमर्स कंपन्यांनी दरवर्षी प्रमाणे फेस्टीव्ह सेलची तयारी सुरु केली आहे आणि ग्राहक या सेलचा फायदा घेऊन स्वस्तात मस्त वस्तू मिळविण्याचे मनोरे रचत असतील तर एक महत्वाची बातमी आहे. यंदा फेस्टीव्ह सेल मध्ये भरपूर डिस्काऊंट मध्ये वस्तू त्यातही इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त मिळण्याची फारशी शक्यता नाही. याला अनेक कारणे असली तरी मुख्य कारण आहे चीनमधील परिस्थिती.

स्मार्टफोन सारख्या इलेक्ट्रोनिक्स वस्तू भारतात बनत असल्या तरी त्यातील ७० टक्के सुटे भाग चीन मधून येतात आणि करोना मुळे अनेक चीनी कंपन्यांना त्यांचे उत्पादन ३० टक्क्यांनी कमी करावे लागले आहे. स्टाफ मध्ये करोना संक्रमण झाल्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसात वाहतूक संकट तीव्र झाले आहे. वाहतूक दरात ५० टक्के वाढ झाली असून गेल्या तीन महिन्यात ही वाढ दुप्पट झाली आहे. पर्यायाने उत्पादकांना उत्पादनांच्या किमती वाढविणे भाग पडले आहे.

२१ ऑगस्ट पासून शांघाईच्या पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम बंद आहे. कोविड १९ क्वारंटाईन पॉलिसीनुसार हा निर्णय अनिश्चित काळासाठी घेतला गेला आहे. त्याचबरोबर याच पॉलिसी नुसार चीनच्या निन्ग्बो जोशामच्या मेथान कंटेनर टर्मिनल वर सुद्धा काम बंद आहे. चीनने त्यांची बंदरे आणि विमानतळाबाबत करोना केसेस आढळत असल्याचे हा निर्णय घेतला आहे. अन्य १५ मोठी बंदरे आणि विमानतळांवरून सर्वाधिक माल परदेशात निर्यात होत असतो तेथून सुद्धा ३० ते ७० टक्केच काम होत आहे.

जेथून काम सुरु आहे तेथे माल निर्यात करणाऱ्या कंपन्यांना गर्दी मुळे प्रतीक्षा करावी लागत आहे शिवाय ऐनवेळी अनेक उड्डाणे रद्द होत असल्याने अडचणीत भर पडली आहे असेही समजते.