भारतीय नाही बाटा कंपनी

आज देशाच्या बहुतेक शहरात, छोट्या शहरात बाटा या पादत्राणे उत्पादक कंपनीचे किमान एक तरी स्टोअर दिसेल. भारतीय जनता बाटा ही भारतीय कंपनी आहे असेच मानते. पण वास्तवात भारतात येऊन या कंपनीला आज ९० वर्षे पूर्ण झाली आहेत आणि ही मुळची भारतीय कंपनी नाही. मात्र आज देशात पादत्राणे उद्योगात बाटाचा वाटा ३५ टक्के आहे आणि देशातील ही नंबर एक कंपनी आहे.

चेकोस्लोव्हाकिया मधील एका छोट्या गावात बाटा परिवार चपला बनविण्याचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या करत होता. जेमतेम उदरनिर्वाह करू शकणाऱ्या या कुटुंबातील तरुण थॉमस यांच्यामुळे १८९४ मध्ये या कुटुंबाचे नशीब पालटले. त्याने कुटुंबाचा हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणवर सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि बहिण भावाला सोबत घेऊन आणि आईकडून ३२० डॉलर्स घेऊन गावातच दोन खोल्या भाड्याने घेऊन उद्योग सुरु केला. त्यासाठी कच्चा माल कर्ज घेऊन आणला. १९०९ पासून त्याने पादत्राणे निर्यात करायला सुरवात केली पण पहिले आणि दुसरे महायुध्द यामुळे जगभर मंदी आली. हा काळ या कुटुंबाला फार अडचणीचा गेला.

१९२५ मध्ये थॉमस भारतात चामडे आणि रबर खरेदीसाठी आला तेव्हा त्याने भारतीयांचा आपली पादत्राणे घालायला लावायची जणू प्रतिज्ञा केली आणि १९३१ मध्ये प. बंगालच्या कोन्नागर येथे पहिला कारखाना सुरु केला. त्यापाठोपाठ बिहारच्या बासगंज, हरियाणाच्या फरीदाबाद, कर्नाटकच्या पिनगा आणि तामिळनाडूच्या होयुर असे पाच कारखाने सुरु केले. स्वस्त, आरामदायी आणि टिकाऊ अशीच जाहिरात केलेल्या या पादत्राणांची विक्री जेव्हा कमी प्रमाणावर होते तेव्हा निम्म्या किमतीत विकण्याची प्रथा सुद्धा कंपनीने सुरु केली. भारत हेच कंपनीचे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय मार्केट असून १९७३ मध्ये बाटा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बनली.

१९३९ मध्ये ८६ दुकाने आणि ४ हजार कर्मचारी असलेल्या या कंपनीची केवळ भारतात ६०० शहरात १४५० दुकाने आहेत. कंपनीची २०२० मध्ये भारतातील कमाई ३१५६ कोटींवर होती. करोना काळात ती घसरून १४५० वर आली आहे. कंपनी पादत्राणे आणि पादत्राणे बनविण्याशी मशीन्स सुद्धा बनविते आणि निर्यात करते.