विपर्यासाचे विच्छेदन करून सत्याला लपवता येत नाही; संजय राऊतांवर शेलारांचा निशाणा


मुंबई – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. आज आपल्या रोखठोक सदरामधून संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यावर शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने आता त्याचे नाव बदलून पाकिस्ताननामा अथवा बाबरनामा करावे, असे शेलार म्हणाले आहेत.

तर,पंतप्रधान मोदींचे फाळणीचा दिवस विसरु नका, असे फर्मान आहे. देशाचे विभाजन म्हणजे अराजकच होते. पाकिस्ताननिर्मितीचे गुन्हेगार हे फक्त महात्मा गांधींना ठरवून नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या झाडल्या. गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्याची वेळ आली नसती, असे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या रोखठोक सदरामध्ये म्हटले आहे.

भाजप नेते आशिष शेलार यावर प्रत्युत्तर देताना म्हणाले की, संजय राऊत यांनी कितीही प्रयत्न केला, तरी या देशाचा वेगळा इतिहास लिहिण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना बळ देण्याचा त्यांनी हा केलेला प्रयत्न आहे. जीना यांनी फाळणी केली याबद्दल दुमत असण्याचे कारणच नाही. गोळीबार, हल्ला किंवा खून गांधीजींचा याचे कुणी समर्थन करण्याचा विषयच नाही. संजय राऊत, विपर्यासाचे विच्छेदन करून सत्याला लपवता येत नाही.

भारतीय लोकांच्या फाळणीच्या आठवणींना एक अर्थाने इतिहासातून धडा घेऊन, नवा इतिहास घडवण्यासाठीचा तो दिवस पंतप्रधान मोदींनी घोषित केला, तर पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागले आणि जे पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागले. त्याच पद्धतीच्या भावना संजय राऊत रुपी संपादकाच्या हातून सामनात उतरायला लागल्यामुळे सामनाने आता नाव बदलून टाकावे, सामनाने त्याचे नाव बदलून पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करावे.

तर, देशाला आणखी एक नवा कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांनी दिला. 14 ऑगस्ट हा फाळणीचा स्मृती दिवस पाळायचा, असे त्यांनी ठरवून टाकले. म्हणजे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचा आनंद सोहळा व 14 ऑगस्ट म्हणजे एक दिवस आधी फाळणीच्या दुःखद आठवणींना उजाळा देण्याचा दिवस म्हणून पाळावा. एका देशाचे अस्तित्व आणि अखंडत्व खात्मा होण्याची वेदना काय असते ते आज आपण अफगाणिस्तानात अनुभवत आहोत. अराजकाच्या नरकात तो संपूर्ण देश आक्रोश करतो आहे. देशाला नरकात ढकलून अफगाणिस्तानचे राज्यकर्ते पळून गेले आहेत. आपल्याला स्वातंत्र्य मिळत असतानाही काय घडत होते? देशाची फाळणी होऊ नये व देश अखंड राहावा असे वाटणारी मंडळी त्यावेळी काय करीत होती?

प्रा. नरहर कुरंदकर यांच्या शब्दांत सांगायचे तर, अखंड भारतवाल्यांनी लढाच दिला नाही. अखंड भारत टिकविण्याची लढाई देण्यापूर्वी ज्या मंडळींनी मुस्लिम लीगचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मान्यच करून टाकला त्याचे वर्णन कोणत्या शब्दांत करावे? अखंड हिंदुराष्ट्रवाल्यांनी नेमके हेच कार्य केले. अखंड हिंदुस्थानचा जयघोष करत या मंडळींनी द्विराष्ट्रवाद म्हणजेच ‘फाळणी’ मान्य केली आणि अखंड हिंदुस्थान टिकविण्यासाठी लढण्याऐवजी युद्धापूर्वीच रणातून पळ काढला. पराक्रमी जखमी वीराला तो पराभूत झाला म्हणून सज्जात बसून चकाट्या पिटणाऱ्यांनी हिणवावे अशातलाच हा प्रकार होता. म्हणजेच एरव्ही जे लढताना मेले आणि जे अंथरुणावर झोपी गेले त्या दोघांनाही सारखेच वंदनीय ठरविण्यात अर्थ नसतो, असे संजय राऊत यांनी रोखठोक सदरात म्हटले आहे.