पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून एकमेकांची पोलखोल करण्यासाठी हजारो रुपयांची बक्षिसे


पुणे : पुण्यात एकमेकांच्या कामांची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून पोलखोल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पुणेकरांना सहभागी होऊन हजारो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. राजकीय पक्षांकडून आगामी महानगरपालिका निवडणुकीचे लक्ष डोळ्यासमोर ठेऊन अशाप्रकारे मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न अशाप्रकारे सुरु झाले आहेत.

खड्डे दाखवा आणि अकरा हजार रुपये मिळवा, कचऱ्याचे ढीग दाखवा आणि एकवीस हजार रुपये मिळवा, बसेसची दुरावस्था दाखवा आणि सात हजार रुपये मिळवा, अशा प्रकारच्या पोलखोल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या अशाप्रकारे एकमेकांची पोलखोल करण्यासाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून हजारो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. या स्पर्धेत पुणेकरांनी सहभागी होण्यासाठी दुरावस्थेचे फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करून ते फोटो या राजकीय पक्षांच्या अकाऊंटला टॅग करायचे. राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या विरोधात जाहीर केलेल्या स्पर्धेत सर्वोत्तम फोटो काढणाऱ्यांसाठी तीन बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

भाजपकडूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या या स्पर्धेला प्रत्युत्तर म्हणून अशीच स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामांची पोलखोल करणारे फोटो सोशल मीडियावर टाका आणि रोख बक्षीस मिळवा, असे आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे.

दोन्ही पक्षांकडून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहिराती आणि फ्लेक्स बाजीवर जोरदार उधळपट्टी सुरू आहे. पण निवडणुकीत या जाहिरातबाजीचा उपयोग होईलच याची खात्री नसल्यामुळे अशाप्रकारे नागरिकांना सहभागी करून घेण्याचे या पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. पण या राजकीय पक्षांना पुणेकर चांगलेच ओळखून आहेत. नागरिकांच्या समस्यांची आठवण या राजकीय पक्षांना फक्त निवडणूक जवळ आल्यावरच का होते? असा पुणेकरांचा सवाल आहे. या राजकीय पक्षाच्या अकाऊंटला बक्षिसाच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात फोटो टॅग केले जात आहेत.