तहसीलदार ज्योती देवरे प्रकरण; असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नको – अण्णा हजारे


अहमदनगर : सध्या एका ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत असलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी केली जात असून उपविभागीय आयुक्तांकडे या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी चौकशी अहवाल सादर केला आहे. दरम्यान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे यांची पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी भेट घेतली. त्यावेळी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपच्या अनुषंगाने चर्चा केली. योग्य त्या कारवाईसाठी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंशी बोलणार असल्याचे यावेळी म्हटले आहे.

अण्णा हजारेंनी असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नको, वेळ पडली तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन असे म्हटले आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी या घटनेनंतर अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी ज्योती देवरे यांच्या कामाबाबत विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या अहवालाची प्रत अण्णांना दाखवल्यानंतर अण्णा हजारे यांनी देखील ज्योती देवरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर योग्य त्या कारवाईसाठी वेळ पडली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणार असल्याचे अण्णांनी सांगितले आहे.

अनेक कामात तहसीलदार ज्योती देवरे यांनी हस्तक्षेप करून हलगर्जीपणा केल्याचा ठपका आहे. तसेच त्यांच्यावर वाळू साठ्यात गैरव्यवहार करून शासनाचे मोठे नुकसान केल्याचा ठपका देखील आहे. ज्योती देवरे यांनी शासकीय कामात नितांत सचोटी व कर्तव्य तत्परता ठेवली नाही. कामाची जबाबदारी नीटपणे पार पाडली नाही. कामात हयगय केली आहे. वरिष्ठांच्या आदेशाचा भंग केला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.