काबुलमध्ये अडकलेल्या 255 भारतीयांची सुखरुप घरवापसी


नवी दिल्ली : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता त्या ठिकाणी अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. भारतीय वायुदलाच्या आणि एअर इंडियाच्या विमानाच्या माध्यमातून आज सकाळी जवळपास अडीचशे भारतीय नागरिक दिल्लीत परतले.

आज सकाळी 168 भारतीय वायुदलाच्या C-17 विमानाने वायुदलाच्या हिंडन बेसवर दाखल झाले. तर त्याआधी 87 भारतीयांना एअर इंडियाने नवी दिल्लीत सुखरुप आणले. काल 150 भारतीयांच्या अपहरणाचे वृत्त आल्यानंतर भारतीयांची अफगाणिस्तानमधून सुटका करण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग आला. अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्याच्या कामामध्ये ताजिकिस्तानमधील भारतीय दूतावास महत्वाची भूमिका बजावत आहे.

एअर इंडियाच्या विमानात भारतीय नागरिक सुखरुपपणे बसताच ‘भारत माता की जय’ असा एकच जयघोष सुरु झाला. दीडशे भारतीयांना अफगाणिस्तानात काबुल विमानतळावर तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याचे धक्कादायक वृत्त शनिवारी हाती आल्यानंतर या दीडशे भारतीयांना ताबिलान्यांनी सोडून दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व भारतीय हे सुरक्षित असून त्यांचा पासपोर्ट तपासल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते.

तालिबान्यांच्या प्रवक्त्यांनी आम्ही भारतीयांचे अपहरण केलं नसून त्यांना सुरक्षित स्थळी नेल्याचा दावा केला होता. तसेच अपहरण केल्याचे वृत्त तालिबान्यांनी फेटाळले होतेहे वृत्त निराधार असून तालिबान अशी कृती कधीच करणार नाही, असा दावा . तालिबानी प्रवक्ता अहमद्दुल्ला वसीक यांनी केला होता.