येत्या १५ ऑगस्ट रोजी देशात भाऊ बहिणीच्या अतूट मायेचा रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. या दिवशी बहिण भाऊरायला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिला तिच्या रक्षणाची खात्री देतो. हा सण कसा सुरु झाला याच्या अनेक कथा सांगितल्या जातात. त्यातील सर्वात प्राचीन कथा पुराणात सांगितली गेली आहे.
अशी झाली रक्षाबंधनाची सुरवात
पुराणातील या कथेनुसार लक्ष्मीदेवीने बळीराजाला पहिली राखी बांधली होती. बळीराजने अश्वमेध यज्ञ आणि कठोर तपस्या केली होती आणि त्यामुळे तो त्रिभुवनाचा राजा बनणार होता. त्याचे पुण्य कमी करण्यासाठी विष्णूने वामनावतार घेतला आणि बलीकडे दान म्हणून तीन पावले जमीन मागितली. त्यात एका पावलात त्याने पृथ्वी, दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापला आणि तिसरे पाउल कुठे ठेऊ असे विचारता बळीने स्वतःचे मस्तक पुढे केले तेव्हा विष्णूने त्याच्या मस्तकावर पाय देऊन त्याला पाताळात ढकलले. त्याने पाताळाचे राज्य बळीला देताना वर मागण्यास सांगितले तेव्हा बळीने तुम्ही सतत माझ्यासोबत राहा असा वर मागितला आणि विष्णू बलीसोबत राहिले. इकडे लक्ष्मी विष्णूंची वाट पाहत होती, नारद मुनी आले तेव्हा तिने विष्णू कुठे आहेत असे त्यांना विचारले तेव्हा नारदांनी विष्णू बळीराजाचे पहारेदार म्हणून राहत असल्याचे सांगितले. तेव्हा लक्ष्मीने विष्णुना परत कसे आणता येईल असे नारदांना विचारले.
यावर नारदांनी सांगितले तू बळीराजाला भाऊ बनव. त्यानुसार गरीब महिलेचे रूप घेऊन लक्ष्मी पाताळात गेली आणि रडत बळीराजाला म्हणाली, मला भाऊ नाही म्हणून मी दुख्खी आहे. तेव्हा बळीने तिला ‘ तू मला भाऊ मान ‘ असे सांगितले. लक्ष्मीने त्यावेळी त्याच्या हातात रेशमी धागा बांधला भेट म्हणून तुझा पहारेदार मला दे असे सांगितले. बळीने लक्ष्मीला ओळखले होते. तो म्हणाला तुझ्या पतीने माझे सर्व वैभव काढून घेतले आणि तू आता त्यालाही नेलेस. बये तू धन्य आहेस. येथूनच रक्षाबंधनाची सुरवात झाली असे मानले जाते.
बहिणीने भावाला राखी बांधताना, ‘ येन बद्धो राजा बळी दानबेन्द्रो महाबला तेन त्वां प्रपद्ये रक्षे माचल माचल ‘ असा मंत्र म्हणून ती बांधावी असे सांगितले जाते.