या ठिकाणी देवाची नाही तर बहिण-भावाच्या समाधीची होते पूजा


सिवान – देशभरात बहिण आणि भावाच्या पवित्र प्रेमाचा सण रक्षाबंधन साजरा होणार आहे. पण देशातील सिवानमध्ये असेच एक मंदिर आहे ज्याला बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक मानले जाते. या मंदिरात श्रावणच्या पवित्र महिन्यात समस्त बहिणी आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा करतात.

‘भइया-बहनी’नावाने प्रसिद्ध असलेल्या या मंदिराची अनोखी कहाणी आहे. महाराजगंज परिसरातील बीखा बांध गावात असलेल्या या मंदिराविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की, या गावातून एक भाऊ त्याच्या बहिणीला सासरहून घेऊन चालला असताना मुगल सैनिकांची नजर त्याच्या बहिणीवर पडली. यामुळे ते भाऊ बहीण घाबरले व त्यांनी धरतीमातेकडे प्रार्थना केली की, धरतीमातेने त्यांना पोटात घ्यावे ज्यामुळे त्यांचे संरक्षण होऊ शकेल. जमीन बहिण-भावाची ही आर्त मागणी ऐकून दुभंगली व दोन्ही धरणीमध्ये सामावले गेले. त्यानंतर येथे दोन वडाची झाडे उगवली व ते एकदुसऱ्यात मिसळलेली आहेत. हे बहिण भावाचे प्रतिक मानले जाते.

स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, हे मंदिर बहिण-भावाची समाधी आहे. येथे संपूर्ण वर्षभर पूजा होते. परंतु श्रावण महिन्यात महिला आपल्या भावाची रक्षा व दीर्घ आयुष्यासाठी पूजा करण्यासाठी दूर-दूरवरून येतात. हे मंदिर चारी बाजुंनी झाडांनी वेढलेले आहे. मंदिर निर्माणाचीही एक कहाणी आहे. लोकांचे म्हणणे आहे की, या जागेवर एक सोनार आला होता जो कुष्ठ रोगाने पीडित होता. यादरम्यान जमिनीत सामावलेल्या बहिण-भावाने त्याच्या स्वप्नात येऊन सांगितले की, जर त्याने या ठिकाणी मंदिर बनवले तर त्याचा रोग बरा होईल. त्यानंतर सोनाराने मंदिराचे निर्माण केले व त्याचा रोग बरा झाला. तेव्हापासून लोक आपली मनोइच्छा पूर्ण करण्यासाठी येथे येतात व मंदिरातील समाधीची पूजा करतात.

Leave a Comment