कहाणी राखीची

आपल्या भारतामध्ये साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणाची काही ना काही कहाणी, कथा आहे, जी अगदी जुन्या काळापासून चालत आली आहे. या कथा वर्षानुवर्ष एका पिढीकडून पुढच्या पिढीला कौतुकाने सांगितल्या जातात आणि पुढल्या पिढीकडून तितक्याच आनंदाने ऐकल्या ही जातात. श्रावण महिन्यातला, भावाबहिणीच्या सुंदर नात्याला जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन.. हा सण नेमका कसा साजरा केला जाऊ लागला याबद्दल निरनिराळ्या रोचक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.

एक कथा अशी आहे, की एकदा, देव आणि असुरांमध्ये युद्ध झाले. जेव्हा देवांचा पराभव अटळ असल्याची चिन्हे दिसू लागली तेव्हा देवांचा राजा इंद्र, गुरु बृहस्पतींकडे मदत मागण्यासाठी गेला. तेव्हा गुरु बृहस्पतींनी इंद्रास सांगितले की श्रावण पौर्णिमेच्या दिवशी जर एक अभिमंत्रित ( मंत्रांनी शुद्ध केलेला ) धागा इंद्राने हातावर धारण केला तर त्याला असुरांविरुद्ध युद्धामध्ये विजय निश्चितच मिळेल. त्या प्रमाणे इंद्राची पत्नी सचि हिने अभिमंत्रित धागा इंद्राच्या हातावर बांधला, ज्यामुळे इंद्राचे व सर्व देवतागणांचे असुरांपासून रक्षण झाले. तेव्हापासून श्रावण पौर्णिमेपासून रक्षाबंधनाची परंपरा सुरु झाल्याचे म्हटले जाते.

संस्कृत मधीलरक्षाबंधनंया शब्दापासून रक्षाबंधन हा शब्द बोली भाषेत आला. हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावण पौर्णिमेस , आणि इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये हा सण येतो. रक्षण करणाऱ्या आणि रक्षिल्या जाणऱ्या व्यक्तीमधील सुंदर नाते जपणारा हा सण. या सणाच्या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुखाची आणि यशाची कामना करते. भाऊ सुद्धा बहिणीला तिचे सदैव रक्षण करण्याचे, तिच्या पाठीशी उभे राहण्याचे वचन देतो. हा सण कसा सुरु झाला याची अजून एक आख्यायिका आहे. असे सांगितले जाते की एकदा श्रीकृष्णाचे बोट कापले असता, द्रौपदीने आपला भरजरी शालू फाडून त्याची चिंधी कृष्णाच्या बोटाला बांधली. त्यामुळे कृष्णाने प्रसन्न होऊन द्रौपदीला, जेव्हा तिला गरज भासेल तेव्हा मदतीस येण्याचे वचन दिले. ते वचन श्रीकृष्णाने द्रौपदीचे वस्त्रहरण होत असता पाळले. द्रौपदीने श्रीकृष्णाचा धावा करताच कृष्ण मदतीस धावून आले.

रक्षाबंधनाची जी सर्वमान्य आख्यायिका आहे ती म्हणजे मेवाड प्रांताच्या राणी कर्णावती आणि बादशाह हुमायून यांची. मेवाडचे राजे राणा संग यांच्या मृत्यनंतर त्यांचे जेष्ठ पुत्र विक्रमजीत गादीवर आले. पण सारा राज्यकारभार राणी कर्णावती बघत असे. जेव्हा गुजरातच्या बहादुरशाहने मेवाड प्रांतावर दुसऱ्या वेळेला आक्रमण केले तेव्हा राणी कर्णावतीने मुघल सम्राट हुमायून यांच्याकडे मदतीचा संदेश पाठविला आणि राखी पाठवून आपल्याला मदत करण्याची कळकळीची विनंती केली. १५२७ मध्ये हुमायून चे पिता बाबर यांनी राणा संग यांचा पराभव केला होता. असे असतानाही राणी कर्णावतीने, हुमायून यांना राखी पाठवून मदतीची गळ घातली. हुमायूननेही राणी कर्णावती च्या विनंतीचा मान ठेवला आणि इतरत्र स्वारीवर गेलेले असतानाही, त्या स्वारीमधून ते राणी कर्णावती च्या मदतीस धावून आले. पण हुमायून मदतीस पोचेपर्यंत उशीर झाला होता. राजपुतांच्या सैन्याचा चित्तोड मध्ये पराभव झाला होता आणि राणी कर्णावती यांनीजौहरया रीतीचा अवलंब करून आपले प्राण दिले होते. हुमायूनला याचे फार वाईट वाटले आणि त्याने मेवाडचे राज्य परत मिळवून राणा विक्रमजीत यांना गादीवर बसवून राणी कर्णावतीस दिलेले मदतीचे वचन पूर्ण केले.

रक्षाबंधनाची परंपरा कशी सुरु झाली याच्या या अश्या अनेक आख्यायिका.

Leave a Comment