रक्षाबंधनाचा इतिहास सांगणाऱ्या या रोचक कथा


यंदाच्या वर्षी 22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सोहळा साजरा होत आहे. भावा-बहिणींचे परस्परांवरील प्रेम आणि त्यांचे भावनिक बंध पुन्हा नव्याने जोडणारा हा सण. हा सण नेमका कसा अस्तित्वात आला, या बद्दलच्या अनेक रोचक कथा आहेत. यातील सर्वात प्रसिद्ध पौराणिक कथा आहे कृष्ण आणि द्रौपदीची. जेव्हा कृष्णाचे बोट कापले, तेव्हा द्रौपदीने तिचा भरजरी शालू फाडून त्याची पट्टी कृष्णाच्या बोटाला बांधली. तिचे हे प्रेम पाहून कृष्णाने सर्व संकटांपासून तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरु झाला असे म्हणतात.

raksha-bandhan
या सणाशी निगडित आणखी एक कथा म्हणजे यम आणि यमुनेची. जेव्हा यमुनेने यमाला राखी बांधली, तेव्हा त्याने तिला अमरत्वाचे वरदान दिले. यमुनेचे प्रेम पाहून यम फारच प्रसन्न झाला, आणि जी बहिण भावाला राखी बांधेल, तिला अमरत्व प्राप्त होईल असा आशिर्वाद त्याने दिला अशी आख्यायिका प्रसिद्ध झाली. तेव्हापासून बहिणीने भावाला राखी बांधण्याचा प्रघात पडला असे म्हणतात.
raksha-bandhan2
इतिहासामध्ये राणी कर्णावती आणि हुमायूनची कथा प्रसिद्ध आहे. राणी कर्णावती मेवाड प्रांताची राणी होती. तिचे पती राणा संग यांच्या मृत्युनंतर तिने राज्यकारभाराची जबाबदारी स्वीकारली. जेव्हा बहादूर शाहने मेवाड प्रांतावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा राणी कर्णावतीने हुमायूनला पत्र लिहून त्याला त्या पत्रासोबत राखी ही धाडली आणि या आक्रमणापासून त्याने मेवाडचे संरक्षण करण्याची गळ कर्णावतीने हुमायूनला घातली. हुमायून मदतीला आला, पण तो वेळेवर पोहोचू शकला नाही. मात्र हुमायूनने मेवाड आपल्या ताब्यात घेऊन ते राणी कर्णावतीचा मुलगा राणा विक्रमजीत याच्या ताब्यात सुपूर्त केले.
raksha-bandhan3
आणखी एक प्रसिद्ध कथा आहे अलेक्झांडरची पत्नी आणि पोरस यांची. जेव्हा सिकंदर आणि पोरस या दोघांमध्ये युद्ध अटळ होते, तेव्हा सिकंदराची पत्नी रोक्साना हिने पोरासाला राखी पाठवून आपल्या पतीला रणांगणामध्ये जीवे न मारण्याबद्दल विनविले. पोरासाने तिची विनंती मान्य करीत संधी असून ही सिकंदराला मारले नाही. अखेरीस सिकंदराने पोरासाचा पराभव केला.
raksha-bandhan4
रक्षाबंधनाशी निगडित आणखी एक पौराणिक कथाही खूप प्रसिद्ध आहे. एकदा देवी लक्ष्मीने आपले रूप बदलून एका निर्धन, अबला स्त्रीचे रूप धारण केले, आणि ती बळीराजाकडे आली. बळीराजाने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या महालाचे दरवाजे उघडून त्या निर्धन स्त्रीचे स्वागत करून तिचे योग्य आदरातिथ्य केले. त्याचे हे वर्तन पाहून प्रसन्न झालेली लक्ष्मी तिथेच राहिली आणि तिच्या कृपेने बळीराजाची संपत्ती दुणावली, राज्यात भरभराट झाली. श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीने बळीराजाच्या मनगटावर धागा बांधला आणि त्याने आपली इच्छा पूर्ण करावी असे सांगितले. बळीराजाने तिची इच्छा विचारातच तिने भगवान विष्णूंच्या सोबत जाण्यची इच्छा व्यक्त केली. बळीराजाने लक्ष्मीची विष्णूसोबत पाठवणी केली. विष्णूनेही वर्षातील चार महिने बळीराजाकडे येऊन राहण्याचे वचन दिले.

Leave a Comment