या बॉलीवूड चित्रपटांचे अफगाणिस्थानात झाले होते शुटींग

अफगाणिस्थान मध्ये तालिबान आक्रमणामुळे परिस्थिती अतिशय बिकट बनली असून जगभरातून अफगाणी नागरिकांसाठी प्रार्थना केल्या जात आहेत. अफगाणी लोक मोठ्या प्रमाणावर देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. अफगाणिस्तानात बॉलीवूड चित्रपट चाहत्यांची संख्या खुप मोठी आहे आणि अमिताभ बच्चन व शाहरुख खान तेथील हिरो आहेत. अफगाणिस्थान मध्ये अनेक हिंदी चित्रपटाचे शुटींग केले गेले आहे. १९७५ पासून अगदी २०२० पर्यंत हा सिलसिला सुरु राहिला आहे.

अफगाणिस्थानमध्ये पूर्वीही तालिबान धोका होता तेव्हा सुद्धा हिंदी चित्रपट शूट केले गेले आहेत. १९७५ मध्ये आलेला धर्मात्मा हा अफगाणीस्थान मध्ये शूट झालेला पहिला हिंदी सिनेमा. यात फिरोज खान, हेमामालिनी, रेखा यांच्या भूमिका होत्या आणि तालिबानीनी नंतर नष्ट करून टाकलेल्या बामिया बुद्ध येथे त्याचे शुटींग झाले होते. हा चित्रपट फिरोज खान यांनीच काढला होता.

अमिताभ बच्चन आणि श्रीदेवीचा खुदा गवाह १९९२ मध्ये अफगाणिस्थान मध्ये शूट झाला होता. त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती नाजिब्बुलाह यांनी अमिताभ यांच्या सुरक्षेसाठी अर्धे हवाई दल तैनात केले होते शिवाय त्यांना तेथे शाही सन्मान दिला गेला होता. २००३ साली फरदीन खान आणि सेलेना जेटलीचा जानशीन या रोमँटिक थ्रीलरचे शुटींग येथे झाले होते त्यावेळी तालिबान मुळे तेथे तणावाचे वातावरण होते.

२००६ मध्ये जॉन अब्राहम आणि अर्शद वारसी यांच्या कबुल एक्सप्रेसचे शुटींग येथे झाले होते तेव्हा तालिबान्यांनी पूर्ण टीम ला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. हा पूर्ण चित्रपट अफगाणिस्थान मधील स्थितीवर आधारित होता.

२०१२ मध्ये सैफअली खान आणि करीना कपूर यांच्या एजंट विनोदचे शुटींग अफगाणिस्थानच्या वाळवंटात झाले होते तर संजय दत्त आणि नर्गिस फाकरी यांच्या भूमिका असलेल्या तोरबाज चित्रपटाचे शुटींग येथे २०२० मध्ये झाले होते. रिफ्यूजी कॅम्प मधील मुलांवर हा चित्रपट आधारित होता.