पुण्यातील स्टेडियमला मिळणार नीरज चोप्राचे नाव

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २३ ऑगस्ट रोजी पुणे भेटीवर येत असून त्यावेळी पुण्यातील स्टेडियमचे नामकरण टोक्यो ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्रा याच्या नावावर केले जाणार आहे असे समजते. डिफेन्स पीआरओ कडून मिळालेल्या माहितीनुसार राजनाथ सिंह आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट परिसरातील स्टेडियमला नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, पुणे छावणी असे नाव देणार आहेत. याचवेळी आर्मीतील १६ ऑलिम्पियन्सचा सन्मान राजनाथ सिंह यांच्या हस्ते केला जाणार आहे. लष्करात नायब सुभेदार पदावर असलेल्या नीरज चोप्राने याच संस्थेत काही काळ प्रशिक्षण घेतले आहे.

टोक्यो ऑलिम्पिक मध्ये भारताला अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात पहिले आणि एकमेव सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचे देशभरात विविध ठिकाणी स्वागत आणि सत्कार सुरु आहेत. त्यांच्यावर बक्षिसांची खैरात केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील स्टेडियमला नीरजचे नाव देण्याचा कार्यक्रम चर्चेत आला आहे.