काय आहे इस्लामी शरीया कानून !

अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबान तेथे शरीया कानून लागू करणार आहे याची घोषणा केली गेली आहे. तालिबान आल्यापासून अफगाणी महिला वर्ग अतिशय घाबरला आहे आणि शरीया कानून मुळे त्यांचे अधिकार अगदी मर्यादित होणार याची भीती त्यांना वाटते आहे.

प्रत्यक्षात काय आहे हा शरीया कानून? शरीया या अरबी शब्दाचा अर्थ पाण्यासाठी स्वच्छ मार्ग असा आहे. त्यावरून कायद्याविषयी काहीच बोध होत नाही. इस्लामचा पवित्र ग्रंथ कुरान आणि मोहम्मद पैगंबर यांच्या उक्ती मधून या कायद्याची निर्मिती झाली असे समजले जाते. थोडक्यात हा कायदा म्हणजे मुस्लीम समाजासाठीची आचारसंहिता म्हणता येईल. यात प्रार्थनेपासून ते गरिबाला दान देण्यापर्यंत अनेक नियम घालून दिले असून प्रत्येक मुस्लीमाची वर्तणूक अल्लाहच्या मर्जीनुसार असावी असे त्यात अभिप्रेत आहे.

जगात आज अनेक मुस्लीम देशात हा कायदा लागू आहे. सौदी, कतार, इराण देशात हाच कायदा पाळला जातो पण तालिबानी शरीया वेगळाच असून त्यांनी स्वतःच त्यात अधिक जहाल कडवेपणा आणला आहे. आय न्यूजच्या बातमीनुसार तालिबानी शरीया संकुचित आणि अति जहाल आहे आणि त्यात मृत्युदंड, अवयव तोडणे, संगीत, टीव्ही बंदी, पाच वेळा नमाज पढणे आणि तसे न झाल्यास दाढी कापून टाकणे, मारहाण करणे अश्या शिक्षा आहेत.

शरीया मध्ये तीन प्रकारचे अपराध मानले गेले आहेत आणि त्यासाठी अमानवी म्हणता येतील अशा शिक्षांची तरतूद आहे. ताजीर म्हणजे कमी गंभीर गुन्हा. यात जज शिक्षा देऊ शकतात. किसास म्हणजे पीडिताला झालेल्या दुखापतीप्रमाणे शिक्षा. म्हणजे डोळ्याला डोळा, हत्येला मृत्यूदंड अश्या शिक्षा. हुदूद अल्लाह म्हणजे गंभीर शिक्षा. यात भेसळ, दारू पिणे, व्यभिचार, चोरी, लुटालूट यासाठी दगडाने ठेचून मारणे, सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालणे, फासावर लटकावणे अश्या क्रूर शिक्षा दिल्या जातात.

तालिबानी शरीया नुसार महिला एकट्या घराबाहेर पडू शकत नाहीत. बुरखा हवा, नोकरी, कामासाठी जाऊ शकत नाहीत, इतकेच काय घराच्या खिडकीतून सुद्धा त्या बाहेर दिसू शकत नाहीत. नेलपेंट लावणे निषिद्ध. नियम मोडल्यास चाबकाचे फटकारे, दगडाने ठेचणे, मृत्युदंड अश्या शिक्षा मिळतात.