रक्षाबंधनाला या गावात व्यक्त होतो शोक


रक्षाबंधन हा भारतीय परंपरेतला भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण संपूर्ण देशभर श्रद्धा अणि उत्साहात साजरा केला जातो. राजस्थानात तर या सणाचे विशेष महत्त्व आहे. मात्र या राज्यातील लघुमेवाड म्हणून परिचित असलेल्या धौलाना क्षेत्रातील साठा गावात मात्र या दिवशी शोक व्यक्त करण्याची प्रथा आहे. रजपूत बहुल असलेला हा भाग रक्षाबंधनादिवशी सुतक पाळतो.

या मागे असे कारण सांगितले जाते की मेवाडचे महाराणा प्रताप याचा याच दिवशी पराभव झाला होता. केवळ राणा हरला असे नाही तर त्याच्याबरोबर हजारो शूरवीरांनीही रणांगणावर देह ठेवला. या गावात राणा प्रतापाचे वंशज आहेत आणि इतिहासातील ही घटना ते आजही विसरू शकलेले नाहीत. यामुळे या गावात रक्षाबंधन साजरे केले जात नाही.

एक गोष्ट अशीही सांगितली जाते की रजपूतांमध्ये रक्षाबंधन हा मोठा सण आहे. या दिवशी रजपूत हाती शस्त्र धरत नाहीत. हे कळल्यामुळेच मुघलांनी या दिवशी चितोडवर हल्ला चढविला आणि राणा प्रतापाला पराभवास सामोरे जावे लागले. या दिवशी रक्षाबंधनासाठी बहिणी आल्या तर त्या भावाला राखी न बांधता काठी, शेतीची अवजारे, अथवा वाहनांवर प्रतिकात्मक राखी बांधतात. गावातील बुजुर्ग सांगतात राणा प्रतापावर झालेल्या हल्ल्याच्या वेळी मरण पावलेल्या वीरांच्या अंगावरच्या कपड्यांचे वजन ५० किलोपेक्षा अधिक भरले होते त्यावरून किती माणसे शहीद झाली याचा अंदाज केला गेला.

Leave a Comment