या भागात गुरांनाही बांधली जाते राखी


मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल सैलाना भागात राखी पौर्णिमेचा सण एक दिवसात संपत नाही तर तो तब्बल साडेतीन महिने साजरा केला जातो. श्रावणी अमावस्येला हा सण सुरू होतो तो कार्तिक चतुर्दशीला त्याची सांगता होते. इथले आणखी एक वैशिष्ठ म्हणजे बहीणी भावांना राखी बांधतातच पण त्यानंतर नांगर, फाळ यासारखी शेतीची अवजारे तसेच घरातील गाईगुरांनाही राखी बांधली जाते. देशातील अन्य भागांप्रमाणे येथेही हा उत्सव मोठ्या धुमधामीत साजरा होतो, घरोघरी पक्वाने होतात, बहीणी भावांना शुभतिलक लावून मनगटावर राखी बांधतात व भाऊही त्यांना सर्व परिस्थितीत रक्षण करण्याचा विश्वास देतात.

राखी पौर्णिमेला सकाळपासून हा उत्सव सुरू होतो तो रात्रीपर्यंच सुरू असतो. बहीण भावाचे राखीबंधन सकाळी साजरे होते तर सायंकाळी कृषी अवजारे, गुरेढोरे यांचे रक्षाबंधन असते. येथील अनेक बहिणी सणानिमित्ताने माहेरी जातात तर कांही जणींना कांही अडचणी आल्यास त्या माहेरी जाऊ शकत नाहीत. पण रक्षाबंधन करायला हवे ही भावना असल्याने त्यानंतर साडेतीन महिन्यात कधीही जाऊन बहीणी भावाला राखी बांधू शकतात म्हणून येथे हा सण साडेतीन महिने साजरा करण्याची प्रथा आहे असे समजते.

Leave a Comment