भाऊरायाला बांधा वैदिक राखी


भाऊबहिणीचे नाते अधिक दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण १५ ऑगस्ट रोजी देशभर साजरा होत आहे. बाजारात त्यासाठी सोने, चांदी पासून साध्या गोंड्यापर्यत अनेक प्रकारच्या राख्या मिळत आहेत. मात्र खरी राखी जी विशिष्ट मंत्र म्हणून भावाला बांधली जाते ती, वैदिक राखी घरी बनवूनच बांधली जाते. भावाचे जीवन सुखी, समृद्ध आणि प्रगतीशील व्हावे या प्रेमभावनेने बांधली जाणारी ही राखी बनविणे अगदी सोपे आणि सहज शक्य आहे. या राखीला धार्मिक महत्व आहे.

ही राखी पाच वस्तूंपासून बनविली जाते. तिला रक्षासूत्र असेही म्हणतात. दुर्वा, अक्षता, केशर, मोहरी आणि चंदन त्यात वापरले जाते. रेशमी किंवा सुती कपड्यात या पाच वस्तू बांधून त्याची छोटी पुरचुंडी करून ती रेशमी दोऱ्यात गुंफली जाते. ज्यांना आवड असेल त्यांना त्यावर सजावट करता येते. राखी साठी वापरायचा कपडा पिवळा, लाल किंवा केशरी घेतला जातो.

या कपड्यात ११ किंवा २१ तांदळाचे दाणे, तेवढेच मोहरीचे दाणे, ७ केशर काड्या, ५ दुर्वा आणि चिमुटभर चंदन घालून त्याची गाठ मारून राखी बनते. यामागचे तत्व असे की, दुर्वा आपोआप वाढणाऱ्या आहेत. त्यामुळे भावाचा वंश वाढवा आणि त्याची प्रगती होत राहावी. तसेच दुर्वा शरीरातील उष्णता कमी करून रक्त शुद्धी करणाऱ्या आहेत. अक्षता म्हणजे न तुटलेला तांदळाचा दाणा. हे अखंडतेचे प्रतिक आहे. केशर तेज देणारे असून सुख समृद्धीचे प्रतिक आहे तर चंदन थंडावा आणि सुगंध पसरविणारे आहे. भावाच्या आयुष्यात शांती राहो, त्याच्या कीर्तीचा दरवळ पसरो अशी त्यामागे भावना आहे तर मोहरी तीक्ष्ण प्रकृतीची आहे आणि त्यामुळे वाईट नजर, दुर्गुणांपासून बचाव करणारी मानली जाते.

ही राखी बांधताना ‘ येन बद्धो बलीराजा दानवेन्द्रो महाबलः, तेन त्वा अभीबद्धनामि रक्षे मा चल मा चल ‘हा मंत्र म्हटला जातो.

Leave a Comment