केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची जिल्हा रुग्णालयाला भेट


नंदुरबार : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन कोविड विषयक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, डॉ.राजेश वसावे, डॉ.के.डी. सातपुते, तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते.

डॉ.पवार यांनी रुग्णालयातील नवजात अर्भक उपचार कक्ष आणि पोषण पुनर्वसन केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेतली. जिल्हा रुग्णालयात त्यांनी कोविड नियंत्रण आणि कुपोषणाबाबत प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.

त्या म्हणाल्या, कोविडच्या तिसऱ्या लाटेच्यादृष्टीने ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवावी. लसीकरण करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोविड चाचण्या सुरू ठेऊन बाधित व्यक्ती आढळल्यास त्याला अलगिकरणात ठेवावे, असे त्यांनी सांगितले.