नाव ठेवण्यात पुणेकरांनी देवांनाही सोडले नाही – अजित पवार


पुणे – देशभरात पुणेरी पाट्यांची कायमच चर्चा होत असते. त्याचसोबत पुण्यातील देवांची, मंदिरांची नावे हा देखील नेहमीच चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरत असतो. पुण्यातच नुकतेच पंतप्रधान मोदी यांचे मंदिरही उभारण्यात आले होतं. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पुण्याच्या याच गोष्टींचे कौतुक असल्याचे आज त्यांनी बोलून दाखवले. पण यावर बोलताना त्यांनी त्यांच्या खास शैलीत मिश्किल टिप्पणीही केली.

पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते, ते सत्य आहे. कारण नेहमीच सर्वांना आपल्या पुणेरी पाट्यांबद्दल कुतुहल असते आणि त्याची चर्चा सर्वत्र पाहण्यास मिळते. त्यामुळे खरोखरच पुणेकरांचा हात कुणी धरू शकत नाही. आज ज्या भागात भूमिपूजन होत आहे, या भागाला डुक्कर खिंड असे म्हटले जाते. काही वर्षांपूर्वी या भागात रानडुकरांचा जास्त वावर असल्यामुळे असे नाव पडल्याचे म्हणत अजित पवार यांनी यावेळी शहरातील काही मंदिरांची नावे दाखवली. ते आपल्या मिश्किल शैलीत म्हणाले, पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवानाही सोडले नाही. त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हशा पिकला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वन विभागाच्या 35 एकर जागेमध्ये भव्य संजीवन उद्यानाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.