रिलीज झाल्यानंतर काही तासातच लीक झाला अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’


बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘बेल बॉटम’ हा चित्रपट रिलीज झाला असून ‘बेल बॉटम’ हा लॉकडाऊननंतरचा पहिला चित्रपट आहे, जो प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस हा चित्रपट उतरला असून चाहते अक्षयच्या अभिनयाची स्तुती करत आहेत. पण, या सगळ्यात चित्रपट लीक झाल्याची बातमी समोर आली आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार इंटरनेटवर अक्षयचा हा चित्रपट फ्री डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे आणि ते सुद्धा एचडी प्रिंटमध्ये. ‘बेल बॉटम’ तमिलरॉकर्स, फिल्मीवॅपसारख्या अनेक पाइरेटेड साइट्सवर ऑनलाइन लीक झाला आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून ‘बेल बॉटम’ या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ‘बेल बॉटम’च्या निर्मात्यांनी कोरोना काळात चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. तर अशा कठीण काळात चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी निर्मात्यांचे आणि कलाकारांचे कौतुक केले आहे.

अक्षयच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटात त्याच्यासोबत लारा दत्ता, वाणी कपूर आणि हुमा कुरैशी देखील आहे. हा चित्रपट काल रिलीज झाला आहे. तर या चित्रपटाची निर्मिती जॅकी भग्नानी आणि दिपशिखा देशमुख यांनी केली आहे.