मोदींचा चातुर्मास, दिवसात एकदाच घेतात आहार

पंतप्रधान मोदी शिव आणि देवी भक्त आहेत हे आता लपून राहिलेले नाही. मोदी नवरात्रात नऊ दिवस नुसते लिंबू पाणी पिऊन उपवास करतात. सध्या मोदी दिवसातून एकदाच आहार घेत आहेत. याचा खुलासा अचानकच झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार टोक्यो ऑलिम्पिक मध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना मोदींच्या निवासस्थानी सोमवारी नाष्टा दिला गेला तेव्हा प्रत्येक खेळाडूशी मोदींनी संवाद साधला. सुवर्णपदकविजेता नीरज चोप्रा याला त्याच्या आवडीचा चुरमा आणि पिव्ही सिंधूला या वेळी आवर्जून आईस्क्रीम खिलवले गेले. त्याचवेळी नीरज चोप्रा बरोबर गप्पा मारताना मोदींनी त्याला ‘तुला परत एकदा माझ्याबरोबर जेवण घ्यावे लागेल’ असे सांगितले तेव्हा नीरजने, ‘तुम्ही यातील थोडा चुरमा घ्या’ असे त्यांना विनविले. तेव्हा मोदींनी सध्या चातुर्मास सुरु आहे त्यामुळे दिवसात एकदाच आहार घेतो असे त्याला सांगितले.

जैन आणि हिंदू संस्कृती मध्ये चातुर्मास पाळण्याची प्रथा जुनी आहे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्यांचा हा काळ. त्यात पूजा, ध्यान, धारणा, आहाराचे नियम पाळले जातात. आहारातून अनेक वस्तू निषिद्ध केल्या जातात. कांदा, लसूण, वांगी असे पदार्थ खाल्ले जात नाहीत. हा काळ पावसाळ्याचा असल्याने पचनशक्ती कमी होते म्हणून अनेकजण या काळात दिवसातून एकदाच आहार घेतात. त्याला नक्त असे म्हटले जाते. मोदी चातुर्मास पाळतात याचा खुलासा अचानकच नीरज याच्याबरोबरच्या गप्पातून झाला आहे.