दाल लेक मध्ये एसबीआयचे तरंगते एटीएम सुरु

पृथ्वीचे नंदनवन म्हटल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये आता तरंगते एटीएम सुरु झाले असून स्टेट बँक ऑफ इंडियाने हे एटीएम प्रसिद्ध दाल लेक मध्ये सुरु केले आहे. त्यामुळे शिकाऱ्यातून दाल लेक बाजारात फेरफटका मारणाऱ्या पर्यटकांना खरेदी साठी रोख रकमेची कमतरता यापुढे भासणार नाही. हे एटीएम दाल लेक मधील हाउस बोटीत सुरु केल्याने त्याला तरंगते एटीएम म्हटले जात आहे. एसबीआयचे चेअरमन दिनेश कुमार खारा यांच्या हस्ते १६ ऑगस्ट रोजी या एटीएमचा शुभारंभ झाला असून बँकेने ट्विटरवर ही माहिती आणि फोटो दिले आहेत.

काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकात दाल लेकची सफर करणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप आहे. दरवर्षी येथे लाखो पर्यटक येतात. दाल लेक मधील शिकारा आणि हाउस बोटीत मुक्काम ही तेथील प्रमुख आकर्षणे आहेत तसाच दाल लेक मधील तरंगता बाजार हेही मुख्य आकर्षण आहे. तरंगत्या एटीएम मुळे पर्यटनाला अधिक चालना मिळेल असे सांगितले जात आहे. याच लेक मध्ये यापूर्वीच तरंगते पोस्ट, तरंगती बँक आणि तरंगती अँम्ब्यूलन्स आहे.

देशातील पहिले तरंगते एटीएम स्टेट बँकेनेच केरळच्या एका नावेमध्ये ९ फेब्रुवारीला सुरु केले आहे. ही बोट एरनाकुलम व वयप्पीयन मध्ये चालविली जाते. केरळ शिपिंग व इनलँड नेव्हिगेशन कार्पोरेशन ही बोट चालविते.