अंतराळात इंटरनेट उपग्रहांची मांदियाळी, वाढला टक्कर होण्याचा धोका

जगभरात अतिवेगवान इंटरनेट देण्याची केवळ घोषणा करून न थांबलेल्या एलोन मस्क यांच्या स्पेस एक्स योजेनेतील १२ हजार उपग्रहांपैकी या घडीला १५०० उपग्रह लाँच झाले असतानाच निराळाच धोका जगापुढे निर्माण झाला आहे. इतक्या प्रचंड संख्येने उपग्रह अंतराळात सोडले गेले तर काय उत्पात होऊ शकतो याची झलक आत्ताच मिळू लागली आहे. अंतराळात उपग्रह गर्दीमुळे त्यांच्या आपसात टकरी होण्याचा धोका निर्माण झाला आहे असे दिसून आले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ साउथन्टप मध्ये झालेल्या एका सर्व्हेक्षणात असे दिसून आले आहे की स्पेस एक्सचे शेकडो उपग्रह अंतराळात सोडले गेल्याने अन्य उपग्रहांबरोबर त्यांची टक्कर होण्याची शक्यता वाढते आहे. डेटा नुसार अंतराळात दोन ऑब्जेक्ट एकमेकांसमोर येण्याचा जो प्रकार घडतो आहे त्यात निम्मे उपग्रह स्टार लिंकचे आहेत. त्यामुळे टक्कर होऊ नये यासाठी ऑपरेटर्सना अतिशय सावध राहावे लागते आहे.

अॅस्ट्रोनॉटीक्स रिसर्च ग्रुपचे प्रमुख ह्यू लुईस यांच्या म्हणण्यानुसार मे २०१९ पासून डेटा तपासला गेला तेव्हा उपग्रह अमोरासमोर येण्याच्या घटना दुपटीने वाढल्या आहेत. दर आठवड्याला किमान ५०० वेळा स्टार लिंकचे उपग्रह दुसऱ्या उपग्रहांच्या समोर येत असल्याचे स्पेस डॉट कॉम च्या अहवालात नमूद केले गेले आहे. ब्रिटनच्या वेबवन चे २५० उपग्रह ८० वेळा स्टारलिंक उपग्रहांसमोर आले आहेत. उपग्रहांची संख्या वाढत जाईल तसा हा धोका आणखी वाढणार आहे.

स्टार लिंकने या संदर्भात असा दावा केला आहे की आयन ड्राईव्हच्या सहाय्याने उपग्रह टकरीपासून बचाव केला जातो. उपग्रहाचा संपर्कच तुटलेला असेल तर स्पेस वाहतुकीसाठी धोका राहतोच. अशी टक्कर झाली तर त्यातून निर्माण होणाऱ्या मलाब्यामुळे अन्य उपग्रह या मलब्याला धडकू शकतात. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्टार लिंकचा दबदबा आहे. अन्य कंपन्याचे ३०० उपग्रह येथे आहेत तर स्टार लिंकचे १३०० उपग्रह आहेत. शिवाय भविष्यात ही संख्या १२ हजारावर जाणार आहे. त्यामुळे धोका वाढला आहे.